जळगाव, दि.१५ – रेमंड चौफुली येथून रिक्षाने रेल्वे स्टेशनला आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या एका परप्रांतीय प्रवाशाची लूटमार करून जबरी चोरी करणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान प्रवाशी निलेश शिलारे यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात रिक्षाचालक व त्याच्या साथीदारा विरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी परिसरातील मिनाक्षी गोल्ड या चटई कंपनीत काम करणारा परप्रातीय निलेश रामलाल शिलारे (वय २९), रा. रामटेक रय्यद जि. हरदा म.प्र., ह.मु रायपुर कुसुबा जळगाव व त्याचा भाऊ शिवा असे दोघे दि.९ रोजी होळी सणानिर्मीत्त त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी रेमंड चौफुली येथुन रेल्वे स्टेशनला रिक्षात जात असतांना रिक्षाचालक व रिक्षामध्ये असलेला रिक्षाचालकाचा साथीदार यांनी रिक्षा रेल्वेस्टेशन कडे न नेता खेडी पेट्रोल पंपाजवळ घेवुन जावुन रात्री १२ वाजेच्या सुमारास दोघं प्रवाशांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन ५०००/- रुपये बळजबरीने काढुन घेतले होते.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञात रिक्षा चालकाचा गुन्हे शोध पथकाकडुन शोध सुरु असताना फिर्यादीने सांगितलेल्या रिक्षाच्या वर्णनावरुन सदरचा गुन्हा हा एमआयडीसी परिसरातील रिक्षा चालकांने केल्या असल्यांबाबतची माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्याप्रमाणे संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेवुन संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
सदरचा गुन्हा त्याने केल्याचे कबुल करुन लागलीच त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, पोउनि दत्तात्रय पोटे, निलेश गोसावी, दिपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी केली आहे.