जळगाव दि.०१ – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्यासह इतर प्रतिष्ठान प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन जळगावात करण्यात आले असून छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे दि. ५, ६, ७ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या शास्त्रीय व उपशात्रीय गायनाची मेजवानी रसिकांसाठी असेल. सोबतच दुसऱ्या सत्रात पं. अनुज मिश्रा व नेहा सिंग मिश्रा यांची कथकवरील जुगलबंदी श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.
कलावंतांचा परिचय..
▪️ज्ञानेश्वरी गाडगे (शास्त्रीय व उपशात्रीय गायन)..
ज्ञानेश्वरी गाडगे हिने लहान वयातच तिचे पहिले गुरु व वडील गणेश गाडगे यांच्याकडे शिक्षण घेतले. सध्या मुंबईच्या प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले यांच्याकडे ती आपल्या गायनाचे धडे गिरवीत आहे. लहान वयातच ज्ञानेश्वरीने रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीने नाशिक, रत्नागिरी, बंगलोर, पुणे, चिपळूण, ठाणे, औरंगाबाद, मुंबई इत्यादी ठिकाणी आपली कला सादर केली आहे. ज्ञानेश्वरी ला या बालगंधर्व संगीत महोत्सवात तिची लहान बहिण कार्तिकी गाडगे संवादिनीची साथ करणार आहे, तर रामकृष्ण करंबेळकर हे तबल्याची साथ करणार आहेत. अशा या हरहुन्नरी दोन्ही बालकलाकारांची संगीत सेवा अनुभवण्याची संधी जळगावकर रसिकांना मिळाली आहे.
▪️पं. अनुज मिश्रा व नेहा सिंग मिश्रा (कथक जुगलबंदी)..
अनुज बनारस घराण्याच्या एका प्रतिथयश सांगीतिक व नृत्यात कार्य करणाऱ्या कुटुंबाचा वंशज आहे. अनुजच्या घराण्यात अत्यंत उत्तम असे कलाकार होऊन गेलेत. अनुज १३ व्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. प्रख्यात सारंगी वादक पं. शिव किशोर मिश्रा व तबलावादक नान्हु मिश्रा व कथक नृत्य कलाकार पं. अर्जुन मिश्रा यांच्या संस्कारांनी मोठा झाला. कथक मध्ये अनुजने खैरागड येथील इंदिरा कला संगीत विद्यापीठातून एमए केले ३० वर्षीय अनुज लखनऊ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारा एक अत्यंत वरच्या दर्जाचा कलाकार आहे. सन २००६ साली बालगंधर्व महोत्सवात पं. अर्जुन मिश्रा यांच्यासोबत अनुज व त्याची बहीण स्मृती हे दोघेही आपले सादरीकरण करून गेलेले आहेत.
▪️नेहा सिंग मिश्रा..
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली कलावंत म्हणून नेहा सिंग मिश्रा सर्वांना सुपरिचित आहे. वाराणसीच्या एका सांगितिक घराण्याची परंपरा लाभलेली नेहा पं. अर्जुन मिश्रा यांची सून असून १३ व्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहे. नेहाचे कथक शिक्षण सुमारे १३ वर्षांपासून पं. अर्जुन मिश्रा व पती पं. अनुज मिश्रा यांच्याकडेच सुरू आहे. नेहाने अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला आहे. नेहा, पं. अर्जुन मिश्रा डान्स अकादमी मध्ये सह नृत्य दिग्दर्शिका असून दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी, विद्यार्थिनींना ती मोफत शिक्षण देत असते
अशा या हरहुन्नरी दोन्ही कलाकारांची कथक जुगलबंदी सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.