जळगाव, दि.१६ – तालुक्यातील वावडदा शिवारात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात ५२ वर्षीय रखवालदाराचा खून केल्याची घटना बुधवारी घडली होती. दरम्यान २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेतील दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. ऐन दिवाळीत या खुनाच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती.
यात पवन बहावीर नारेला, वय ३०, वाघाड ता.राजापूर जि.बडवाणी व बारसिंग शोभाराम बारेला वय २४, रा. सालीफल (सालीतांडा) ता. राजापुर वाणी मध्यप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पवन यास गुन्ह्याची विचारपूस केली असता, शेतातून ट्रॅक्टर चोरी करत असताना रखवालदाराचा कशा पद्धतीने खून करण्यात आला. या संदर्भातील संपूर्ण घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला.
संशयित पवन बहावीर नारेला हा राजेंद्र ईश्वर पाटील यांच्या शेतात काम करणारा सालदार असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान पवन व घटनेत त्याला मदत करणारा बारसिंग शोभाराम बारेला या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन त्यांच्या मुस्क्या आवाळण्यात आल्या.
उप विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश सबले यांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी API निलेश राजपूत, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींचे पथक तयार करण्यात आले होते.