जळगाव, दि.२९ – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जळगावात सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा वितरण व पुरस्कार वितरण केले जाणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी रविवारी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे संघटनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
कार्यक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज, अधिस्वीकृती समितीचे (महाराष्ट्र शासन) अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे व संपूर्ण कार्यकारी मंडळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतं असलेल्या विमा कवच हा प्रेरणादायी उपक्रम राज्यात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यातून सुरू केला असून त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३०० पत्रकारांचे दहा लाखांचा विमा काढण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवला असल्याचे सांगितले. त्याचबरोबर संघटनेच्या वतीने आम्ही देखील राज्यभर विमा कवच उपक्रम राबविणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोना काळात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून शासनाने जाहीर केले होते. मात्र कोरोना काळात मृत्यू झालेल्या १५६ पत्रकारांपैकी एकाही मृत पावलेल्या पत्रकाराच्या परिवाराला मदत मिळाली नाही, याबाबत वसंतराव मुंडे यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमात २० पुरस्कार्थीचा सन्मान..
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अल्पबचत भवन येथे दि.३० रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यासह, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, भगवान मराठे, संतोष नवले, दीपक सपकाळे, प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, सुरेश पवार ,संतोष राठोड आदी उपस्थित होते.