जळगाव, दि.०७ – इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त येथील एस.एन.डी.टी महिला महाविद्यालयात ‘ब्रेस्ट कॅन्सर कसा ओळखावा आणि त्याबाबतची काळजी’ या विषयावर रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट डॉ. गीतांजली ठाकूर यांचे माहितीपर व्याख्यान दिले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, रेडक्रॉसचे रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, एन.एस.एस. विभागाचे प्रमुख माधव पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होते.
गेल्या आठ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण परिक्षेत्रात स्तन कर्करोग विरोधी जनजागृती व आरोग्य शिबीर आयोजित करणाऱ्या सुखकर्ता फाउंडेशनच्या अध्यक्षा व रेडिओलॉजिस्ट डॉ. गीतांजली ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले कि, भारतात जवळजवळ प्रत्येक वर्षी ८० हजार महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. आणि दुर्देवाने त्यातील ३० हजार महिला मरण पावतात. ब्रेस्ट कॅन्सर जर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजवर लक्षात आला. तर आपण सहज त्यातून बाहेर पडू शकतो. त्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिले पाहिजे. कॅन्सर झाल्यावर काळजी आणि उपचार करण्यापेक्षा कॅन्सर होऊच नये यासाठी जीवनशैलीत बदल करावेत असे आवाहन त्यांनी केले.
स्तन कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास ,योग्य उपचार मिळाल्यास, सकारात्मक विचारांच्या आधारे स्तन कर्करोगाशी यशस्वी लढा देणे शक्य होत आहे व त्यासाठी महिलांनी तरुणवयापासूनच शास्त्रोक्त स्वपरीक्षण (सेल्फ ब्रेस्ट परीक्षण) करण्याची सवय अंगीकारणे हा एक सोपा मार्ग असल्याचे प्रतिपादन डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी ह्या प्रसंगी केले.
स्वपरीक्षण कसे करावे ह्याचे हि विस्तृत विश्लेषण पोस्टर च्या माध्यमातून ह्या वेळी करण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून युवतींनी ह्याविषयी असलेल्या गैरसमज व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी अतिशय माहिती पूर्ण व्याख्यान आयोजित केल्याबद्दल रेडक्रॉसचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पाटील यांनी केले.