जळगाव, दि. १४ – जळगांव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन आणि श्री साई बजरंग जिमच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जळगावात बाळासाहेब ठाकरे चषक १९ वी ‘जळगांव जिल्हा श्री २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन २३ जानेवारी ला येथील श्री साईबजरंग जिमच्या पटांगणात करण्यात आले आहे.
यासंदर्भात महिती देण्यासाठी शनिवारी शहरातील जिल्हा पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी महिती दिली. यावेळी मार्गदर्शक प्रा.हरिशचंद्र सोनवणे, सचिव अक्षय चव्हाण, राजेश बीर्हाडे उपस्थित होते.
स्पर्धेत भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियमाप्रमाणे ० ते ५५ कि.ग्रॅम, ५६ ते = ६० कि.ग्रॅम, ६१ ते ६५ कि.ग्रॅ., ६६ ते ७० कि.ग्रॅ., ७० कि.ग्रॅम वरील असे एकुण ५ वजनी गट राहतील.
वरील वजनी गटात बक्षिसे अनुक्रमे १ ते ५ क्रमांक विजयी स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक रू. ५००१/-, द्वितीय क्रमांक रू. ४००१/-, तृतीय क्रमांक रू.३००१/-, चतुर्थ क्रमांक रू. २००१/-, पाचवा क्रमांक रु.१००१/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल. एकमेव विजयी स्पर्धकास ‘बाळासाहेब ठाकरे चषक २०२३’ रोख रक्कम रू.२१०००/- देण्यात येईल. तसेच बेस्ट पोझर रू.५००१/-, मोस्ट इम्प्रुव्हड रू. ५००१/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तराचे स्पर्धेकरीता वापरण्यात येणारे भव्य रंगमंच डिजीटल स्क्रीन, विशिष्ट प्रकारचे प्रकाश संयोजन, उच्च प्रतिचे साऊंड सिस्टीम्स्, स्पर्धकांची रंगमंचासमोर प्रेक्षक व खेळाडूंची वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियोजन शिस्तबध्द व्हावे याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.