गजानन पाटील | अमळनेर, दि. 30- अभ्यासाबरोबरच खेळाला देखील अन्यन्यासाधरण महत्व आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पात तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटींची तरतूद केली जाईल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी एस हायस्कूल च्या आय एम ए हॉल मध्ये आयोजित सन्मान सोहळयात बोलताना दिले.
महसूल विभाग , अमळनेर तालुका क्रीडा समिती व जी एस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , संस्थाचालक प्रकाश मुंदडा , अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील , दीपक पाटील, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. आमदार पुढे म्हणाले की कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे. शाळा नाही तर खेळ नाही त्यामुळे मुले मोबाईल शी खेळत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास यावर दुष्परिणाम होत आहेत. सर्व प्रथम हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. योग दिनानिमित्त ऑनलाईन सर्वाधिक हजार विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या ग्लोबल व्ह्यूव्ह स्कूल चे क्रीडा शिक्षक विनोद पाटील व संस्थाध्यक्ष प्रकाश मुंदडा यांचा सुवर्ण पदक व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोविड काळात सामाजिक क्षेत्रात आरोग्यदूत म्हणून काम करणारे अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील, खोखो चे राज्यस्तरीय खेळाडू वैभव साळी, धीरज रोकडे, विभागीय फुटबाल खेळाडू रेहान शेख, मुसेफ सलीम, हासीम शेख शब्बीर अली, अल्तमश सैय्यद शफी, तालुका क्रीडा संघटनेचे अद्यक्ष सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील यांचा पदक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास सचिव डी डी राजपूत, युवक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष निलेश विसपुते, आर आर सोनवणे, विलास चौधरी, विनायक सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक विनोद पाटील, सॅम शिंगाणे, सोमचंद संदानशीव, हिम्मत देसले व विद्यार्थी हजर होते.