लालसिंग पाटील | भडगाव, दि.29 – कजगाव येथे एका महिलेस सर्प दंश झाल्याची घटना नुकतीच घडलीयं. मार्केट रोडवरील रहिवासी प्रमिला सुरेश महाजन (वय वर्ष 52) या दुपारी घराजवळ असलेले पत्रे उचलत असतांना पत्र्याच्या खाली असलेल्या सापाने त्यांना दंश केल्याचे जाणवले. लगेच सदर महिलेने आवाज दिल्याने नागरिकांची गर्दी झाली.
महिलेस तात्काळ कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठीकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. स्वप्नील पाटील यांच्या टीम ने प्रथमोपचार केले. दरम्यान प्रथमोपचार केल्या नंतर रूूग्णास चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने सदर महिला प्राण वाचले असून महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान सर्प मित्र एकनाथ सोनवणे यांना सर्प पकडण्यासाठी बोलविण्यात आले. त्यांनी पत्र्या खाली दडून बसलेल्या सहा ते सात फुटी विषारी नागास पकडले. सर्प मित्र सोनवणे यांनी नागास जंगलात सोडले. पकडलेला हा नाग अति विषारी असल्याने रूग्णावर योग्य वेळात योग्य उपचार झाल्याने महिला बचावली. त्यामुळे गावात एकाच चर्चेला उधाण आले होते, देव तारी त्याला कोण मारी. या म्हणीचा प्रत्यय आला असल्याची गावात चर्चा होती.