गजानन पाटील | अमळनेर, दि.०९ – तालुक्यातील कळमसरे येथील गावचे ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेचा यात्रोत्सव शनिवारी पहाटे पासून सुरू झाला. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर दुर्गा अष्ठमीला हा यात्रोत्सव थाटात साजरा करण्यात येतो.
गावाच्या पच्छीमेला शहापुर रसत्यावर मोठ्या भवानी मातेचे मंदिर असून गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर आहे. हा यात्रोत्सव लहान भवानी मातेच्या मंदिर परिसरात भरविला जातो. यात्रोत्सवाला सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असून नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतून भाविकांची मोठी गर्दी होत असते. भवानी मातेचा यात्रोत्सव एक दिवसाचा असला तरी व्यवसाय नोकरी तसेच कामानिमित्त बाहेर गावी असणारे आप्तेष्ट भाऊबंदकी या यात्रेनिमित्त गावाला एकत्र येऊन मनोभावे दर्शन घेत असतात.
यात्रोत्सवानिमित्त भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली असून गावात उपहारगृहे, पाळना, खेळन्याची दुकाने लावण्यात आली असून रात्री लोक मनोरंजनासाठी सुकलाल बोराडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन देखील करण्यात आले. यात्रोत्सव शांततेत संपन्न व्हावा यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी विशेष दक्षता घेत आहेत.
माळी समाजाचा सामूहिक नवस फेडीचा कार्यक्रम..
कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून बंद असलेली यात्रा यंदा साजरी होत असल्याने गावात नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी असते. कळमसरे येथील रहिवासी सूरत येथील माळी समाजाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर चौधरी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दक्षा चौधरी यांनी गावातील माळी समाजाच्या सामुहिक नवस फेडण्याच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी सामूहिक नवस फेडुन गावासह परिसरातील पाच हजार भाविकाना महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन चौधरी परिवाराच्या वतीने करण्यात आले.