जळगाव, दि.०४ (जिमाका) – महाराष्ट्र राज्य शासनाने अथवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारचा कोणताही परवाना कोणालाही अद्याप जारी केलेला नसून, प्रवाशांची फसवणूक होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये. तसेच अशा ॲपचा वापर करु नये. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
बाईक टॅक्सी वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा वाहनांविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तरी याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील जळगाव उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.