जळगाव, दि.२६ – राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट आता बर्यापैकी दूर झाल्यानेे मी पुन्हा महाविद्यालयांत, विद्यापीठांत जातो तेव्हा तेथे परीक्षा रद्द करणारा मंत्री आलेला आहे, अशी माझी प्रसिद्धी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, मी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक अशा सर्वांनाच सांगू इच्छितो, की ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती ही ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने निवडलेला पर्याय होता. तो कायमस्वरूपी निवडलेला नाही. त्यामुळे यापुढे संपूर्ण शिक्षण पद्धतीत ‘ऑनलाईन’ नव्हे; तर ‘ऑफलाईन’कडेच जावे लागणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत राहण्याचे काहीही कारण नाही.
तसेच ’ऑनलाईन’ पद्धतीतून उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर ‘कोविड’ बॅचचा विद्यार्थी म्हणून ठपका ठेवला जाणार नाही. तसेच येत्या दोन वर्षांनंतर ‘एमएच-सीईटी’ ही परीक्षा वर्षभरात एक नव्हे; तर दोन वेळा घेण्यात येईल. त्यात बारावीच्या अभ्यासक्रमाला 50 टक्के व एमएच-सीईटी परीक्षेसाठी 50 टक्के गुणांची विभागणी केली जाईल. म्हणजे बारावी 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो, तरी चालते, ही मानसिकता दूर होऊन विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडेच राहील, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
युवा सेनेतर्फे शनिवारी जळगावात ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांवर ऊहापोह व्हावा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या वतीने सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याद्वारे मुलाखतीचे आयोजन केले गेले. त्यात गाडगीळ यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी सरस्वती पूजन केले. त्यानंतर समस्त जळगावकरांच्या वतीने महापौर तथा जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व विशाल वाणी, महापौर जयश्री महाजन यांचा वैष्णवी खैरनार, जया थोरात व यशस्वी वाघ, तर युवा सेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे यांचा शंतनू नारखेडे व अमित जगताप यांनी सत्कार केला. तर युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव विराज कावडिया यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, स्वप्नील परदेशी यांच्यासह युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.