जळगाव , प्रतिनिधी : दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या चांगलेच अंगलट आले. दात साफ करताना अचानक सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण उपचार करत ही टोकदार सेफ्टी पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली.

अन्ननलिकेत अडकलेली टोकदार सेफ्टी पिन बाहेर काढणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. ही प्रक्रिया करताना अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे तसेच सेफ्टी पिन श्वसनमार्गात जाणे अशा गंभीर गुंतागुंतींचा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरी बाळगत ही आव्हानात्मक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

या उपचारांसाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. कान, नाक व घसा विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय सरोदे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललित राणे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. विनोद पवार, डॉ. दीपिका ओक व डॉ. अनिकेत दौंड, तसेच कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. किरण गोरे, डॉ. यश सिसोदे आणि डॉ. साक्षी पोखरणा यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.
भूलशास्त्र विभागाचे डॉ. ऋतुराज काकड, डॉ. चेतनकुमार अद्राट, डॉ. नेहा पाटील आणि डॉ. समीर तडवी यांनीही सहकार्य केले. मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील आणि अश्विनी सोनवणे यांनी मोलाची भूमिका बजावली. दोन्ही विभागांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया यशस्वी झाली.
दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिन, सुई किंवा अन्य टोकदार वस्तूंचा वापर करू नये. अशा वस्तू चुकून गिळल्या गेल्यास किंवा अन्ननलिकेत अडकल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. अक्षय सरोदे यांनी केले आहे.








