भडगाव / कजगाव, प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गोडगाव रोड परिसरात मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भरसायंकाळी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे कजगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जयेश नाना धोबी (पवार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पारोळा रस्त्यावरील सोलर कंपनीत कामावर जात असताना हा जीवघेणा हल्ला झाला.

प्राथमिक माहितीनुसार, जयेश धोबी (पवार) हा नेहमीप्रमाणे पारोळा रोडवरील सोलर कंपनीत कामासाठी निघाला होता. गोडगाव रोड परिसरात आला असता अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी होऊन कोसळला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला धुळे येथे हलविण्यात आले आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपास सुरू केला. हल्लेखोर कोण होते, त्यांनी गोळीबार का केला आणि यामागे नेमका कोणता हेतू होता, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
कजगावसारख्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अज्ञात हल्लेखोरांचा छडा लावून घटनेमागील कारण उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलीस तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.








