जळगाव, प्रतिनिधी : दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस चाकूचा धाक दाखवून व धमकावून जबरदस्तीने दुचाकीवरून नेल्याप्रकरणी आरोपी प्रवीण सलतान चव्हाण (वय २२, रा. करगाव तांडा क्र. ४, ता. चाळीसगाव) यास न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता आणि तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. विशेष सरकारी वकील अॅड. चारुलता बोरसे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.
अखेर न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.








