१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

जळगाव, प्रतिनिधी: शहराचे ग्रामदैवत आणि वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सवाचा भव्य सोहळा शनिवारपासून (दि. २१ नोव्हेंबर) सुरू होत आहे. कार्तिकी प्रबोधिनीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ७ वाजता श्रीराम प्रभूंचा महाअभिषेक होईल. त्यानंतर सकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान भजनाचा कार्यक्रम पार पडेल. सकाळी १०.३० वाजता श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त तथा विद्यमान गादीपती ह.भू.प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते वेदशास्त्रसंपन्न पद्धतीने श्रीराम रथाचे महापूजन करण्यात येणार आहे.

सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरातून भव्य रथयात्रेस सुरुवात होईल. गरुड, मारुती, अर्जुन आणि दोन लाकडी घोडे तसेच आकर्षक फुलांनी सजविलेला श्रीराम रथ हे या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रथयात्रा प्रस्थानापूर्वी प.पू. नृसिंह विजेयेंद्र सरस्वती (विदुल आश्रम, मध्य प्रदेश), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पाटील, माजी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काते, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने आणि पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन होणार आहे.
श्रीराम मंदिरातून निघालेला हा रथ कोल्हे वाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, मंदिरामागील गल्ली, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, जळगाव पीपल्स को-ऑप. बँक, नेहरू चौक, गांधी मार्केटमार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिरात पोहोचेल. तेथे भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मरिमाता मंदिर, दधीची चौक मार्गे बालाजी मंदिराकडे जात रात्री १२ वाजता रथाचे पुन्हा रथ चौकात आगमन होईल.








