जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. बोदवड, शनिपेठ आणि आर्थिक गुन्हे शाखेतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी सायंकाळी जारी केले. अचानक झालेल्या या फेरबदलांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बोदवडचे प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याकडे एएचटीयूच्या प्रभारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पद रिक्त झाल्याने तेथील दुय्यम अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. या फेरबदलांबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी सायंकाळी जारी केले.
सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना मानव संसाधन विभागातून एएचटीयूच्या प्रभारी अधिकारीपदाचा देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार सोपविण्यातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना यापुढे जळगाव येथील मानव संसाधन विभागात मूळ पदाचे पूर्णवेळ कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनाही शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार जनहित, प्रशासकीय कारणे आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी या बाबी लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.








