जळगाव, प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरिता अशोक पाटील (वय ४३, रा. सुसरी, ता. भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. कांद्याच्या शेतात निंदणीचे काम सुरू असताना खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी सरिता पाटील हे सोमवारी नेहमीप्रमाणे मजुरांसह शेतात कामासाठी गेले होते. कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने पती-पत्नी तण काढण्याचे काम करीत होते. दरम्यान, अशोक पाटील यांचा शेतात खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. जवळच काम करीत असलेल्या सरिता पाटील यांनाही विजेचा धक्का बसला.

दोघांनाही तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुसरी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत तार नेमकी कोणत्या कारणाने खाली पडली, याबाबत तपासातून स्पष्टता येणार आहे.
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर.. अशोक पाटील आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. घरात मंगलकार्याची तयारी सुरू असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, साखरपुड्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबाचा आनंद क्षणात नाहीसा झाला.
ज्या घरात काही दिवसांत साखरपुड्याची लगबग सुरू होणार होती, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगापूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ग्रामस्थांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे करीत आहेत. शेतातील विद्युत तार खाली पडण्यामागील कारण आणि दुर्घटनेची परिस्थिती याबाबत चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावावर शोककळा पसरली आहे.








