जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार, २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि ३० नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

दरम्यान, नव्या सहकारी तरतुदींनुसार, ज्या संचालकांचा सलग दहा वर्षांचा कार्यकाळ झाला आहे, अशा संचालकांना या निवडणुकीत पुन्हा भाग घेता येणार नाही. त्यामुळे विद्यमान चेअरमन संजय पवार, संचालक व आ. अनिल भाईदास पाटील, आ. किशोर पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, आ. अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी चेअरमन ॲड. रोहिणी खडसे या दहा जणांना निवडणुकीत भाग घेता येणार नाही. या तरतुदीचा निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल होणार की स्वतंत्र पॅनल उभे राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








