जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपा स्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर १ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात शहरातील तब्बल १६ संघांनी सहभाग घेतला होता. अनुभूती स्कूलच्या मुलांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ, वेग आणि शिस्तीचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात अनुभूती स्कूलच्या संघाने श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या संघावर मात करत विजेतेपदाची ढाल उंचावली.

अंतिम सामन्यातील या शानदार विजयामुळे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची आता पुढील स्तरावरील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट सांघिक भावनेच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी तसेच शिवम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांकडून कसून सराव करून घेतला होता. विद्यार्थ्यांच्या या विशेष यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.








