जळगाव, प्रतिनिधी : आयकर रिटर्न भरताना योग्य ती काळजी न घेतल्यास करदात्यांना आयकर विभागाकडून कराची मागणी नोटीस येणे किंवा टीडीएस क्रेडिट न मिळणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे करदात्यांनी रिटर्न भरताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन प्राप्तिकर विभागाच्या (सर्कल १) उपायुक्त सुनिता व्ही. लँगस्टिएह यांनी केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘डॉ. अनिकेत सेमिनार हॉल’मध्ये आयकर विभागातर्फे ‘तफावत व मागणी नोटीस टाळण्यासाठी मार्गदर्शन’ या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य व डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, कृष्णमूर्ती अय्यर, दीपक गुप्ता, मणी भगत, दीपक श्रीवास्तव आणि रवींद्र कुमार या अधिकाऱ्यांसह संस्थेचे विविध प्राचार्य, अधिष्ठाता, डॉक्टर आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमात कृष्णमूर्ती अय्यर यांनी चित्रफितीद्वारे कराची मागणी निर्माण होण्याची मुख्य कारणे स्पष्ट केली. यामध्ये आयकर विभागाची नोंद आणि रिटर्नमधील दावा यातील ‘टॅक्स क्रेडिट तफावत’, भरलेला अॅडव्हान्स टॅक्स सीपीसी रेकॉर्डशी न जुळणे, घोषित उत्पन्न व सीपीसीद्वारे प्रक्रिया केलेले उत्पन्न यातील फरक, प्रक्रियेदरम्यान लावलेले व्याज आणि मागील वर्षांची प्रलंबित मागणी या कारणांमुळे परताव्यात अडथळा येतो, असे त्यांनी सांगितले.

करदात्यांसाठी महत्त्वाची चेकलिस्ट:
फॉर्म २६एएस व AIS तपासणे: फॉर्म २६एएस हे टॅक्स पासबुकसारखे असून वार्षिक आर्थिक विवरणपत्र (AIS) पॅनकार्डशी जोडलेले असते. रिटर्न भरण्यापूर्वी ते नक्की तपासावे.
नियमित पोर्टल तपासणी: नोंदणीकृत मोबाईलवर आलेले मेसेज आणि ई-फायलिंग पोर्टल वेळोवेळी तपासावे.
टीडीएस दुरुस्ती: कपात केलेला टीडीएस पोर्टलवर न दिसल्यास संबंधित कपातदाराशी (Deductor) संपर्क साधून त्वरित दुरुस्ती करून घ्यावी.
तक्रार नोंदणी: माहितीमध्ये कोणतीही चूक आढळल्यास पोर्टलवरून त्वरित दुरुस्ती तक्रार अर्ज दाखल करावा.
”अचूक माहिती देणे आणि माहितीचे योग्य जुळवाजुळव करणे हाच मागणी नोटीस टाळण्याचा एकमेव मार्ग आहे,” असा सल्लाही या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला.








