भुसावळ, (प्रतिनिधी) : शहर पोलीस स्टेशन आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी टेक्निकल हायस्कूल परिसरात सापळा रचून एका २१ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. गणेश संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, ‘गण्या लोहार’ नावाचा इसम भुसावळ येथील टेक्निकल हायस्कूलजवळ स्वतःजवळ गावठी बनावटीचा कट्टा बाळगून उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह पंचांच्या समक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

त्यावेळी सदर ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या वावरताना दिसून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला खोचलेले ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल (मॅगझीनसह) आणि २ हजार रुपये किमतीचे २ जिवंत राऊंड (काडतुसे) असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी तत्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हजर केले. आरोपीने हे अग्निशस्त्र कोठून आणले आणि याचा वापर कशासाठी केला जाणार होता, याबाबत भुसावळ शहर पोलीस अधिक तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रेड पीएसआय इक्बाल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे, गजानन पाटील, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि चालक अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.








