जळगाव, प्रतिनिधी : पिंप्राळा परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रामानंदनगर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या (पंटर) मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, घटनास्थळावरून तीन ग्राहक, कुंटणखाना चालविणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई मंगळवारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात बेकायदेशीरपणे कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, एएचटीयू विभागाच्या प्रभारी माधुरी बोरसे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.

कारवाई निश्चित करण्यासाठी पोलिसांनी एका डमी ग्राहकाला (पंटर) संबंधित घरात पाठवले. व्यवहार पक्का होताच, ठरल्यानुसार डमी ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवर मिस्ड कॉल दिला. मिस्ड कॉल मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ घरावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान तिथे ४ महिला आढळल्या, ज्यांची पोलिसांनी सुटका केली. तसेच कुंटणखाना चालवणारी महिला, दोन पुरुष आणि ३ ग्राहक पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ग्राहक व कुंटणखाना चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.








