जळगाव, प्रतिनिधी : जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील व्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी या चिमुकल्याचा आयशर वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी रस्ता रोको करत आंदोलन केले. परिस्थिती चिघळल्यानंतर संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर वाहनाला आग लावली.

शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा व्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. यात्रा आटोपून भाविक परतत असताना जळगावकडून चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या ओम शांती ट्रान्सपोर्टच्या MH-20-EG-3593 क्रमांकाच्या आयशर वाहनाने प्रबल गवळी याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाने प्रबलला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच प्रबलचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. एकुलता एक मुलगा गमावल्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संतप्त नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत चालकाला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

घटनेनंतर संताप वाढत गेला आणि जमावाने किराणा मालाने भरलेल्या संबंधित आयशर वाहनाला आग लावली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जमावाला शांत करताना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी किरकोळ धक्काबुक्की झाल्याचे समजते. सायंकाळी सुमारे ५ ते ६.३० वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, अपघातातील आयशर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. कावड यात्रेतील उत्साहाचे वातावरण या दुर्घटनेमुळे क्षणात शोकाकुल झाले असून ममुराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








