जळगाव, (प्रतिनिधी) : ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत नगरपरिषद नशिराबाद आणि आयुष्मान आरोग्य मंदिर नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गावात कीटकजन्य, जलजन्य व संसर्गजन्य आजारांविषयी व्यापक जनजागृती मोहीम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमन पटेल व डॉ. स्नेहा कोलते यांच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या अभियानादरम्यान डासांपासून होणारे डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली, तसेच ग्रामस्थांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. यासोबतच कुष्ठरोग, क्षयरोग (टीबी) आणि कर्करोग प्रतिबंधात्मक ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये प्रभावी प्रबोधन करण्यात आले. आरोग्य शिबिरादरम्यान गरोदर मातांची विशेष रक्त तपासणी व इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी, आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक तायडे, वासुदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय सपकाळे, नीलिमा येलगिरे, आरोग्य सेविका सुवार्ता ढालवाले, बफी साळुंके, हसरा तडवी आणि स्थानिक आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








