जळगाव, (प्रतिनिधी) : नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या अंतर्गत आयोजित ‘मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे’द्वारे विविध गुन्ह्यांमधील एकूण २ कोटी १६ लाख ८४,९३० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ फिर्यादींना हस्तगत करण्यात आला आहे.
हा हस्तांतरण सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या मोहिमेत जळगाव उपविभागाने ७३,५१,२०८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, ज्यात ८४ मोबाईल, सोन्याचे दागिने, चांदी, रोकड आणि वाहनांचा समावेश आहे. चाळीसगाव उपविभागाने १,१५,१६,२२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, ज्यामध्ये ३३३ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोकड, ७५ मोबाईल आणि वाहने परत मिळवण्यात आली.
तसेच, सायबर पोलीस स्टेशनने तांत्रिक कौशल्याचा वापर करून शोधलेले २७,१७,५०० रुपये किमतीचे एकूण २०१ मोबाईल फोन नागरिकांना परत केले. याशिवाय, जळगाव पोलिसांनी सन २०२६ मध्ये खून, बलात्कार, पोक्सो आणि एटीएम चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध तपास करून अनेक आरोपींना न्यायालयातून कठोर शिक्षा मिळवून दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना कोणत्याही गुन्ह्याची किंवा संशयास्पद घटनेची माहिती त्वरित पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








