जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध आस्थापनांच्या भेटींचा धडाका सुरू केला आहे. त्या अनुषंगाने मंगळवार दि. ५ मे रोजी त्यांनी रावेर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये व संस्थांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी रावेर पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन कार्यालयीन कामकाज, आस्थापना विषयक बाबी तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात गती आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी रावेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करून पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच, रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामपातळीवरील प्रशासनाची पाहणी केली. त्यानंतर ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन औषध साठा, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी ऐनपूर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी करून त्याच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला.







