जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी बहुउद्देशीय संस्था आणि क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या सोमवारी झालेल्या सत्रात जळगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा जंगी सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
राजकीय आणि सामाजिक समन्वयाचा सोहळा..
महोत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर आले होते. जळगाव महापालिकेतील सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविकांचा सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सन्मान सोहळा आणि पुरस्कारार्थी..
या सोहळ्यात आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या होनाजी चव्हाण, सागर वाघ, चंद्रकांत सोनवणे, मनोज भंडारकर आणि भिका न्याहाळदे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणारे उज्वल बेंडवाल आणि विकी सोनार यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे (राजूमामा), पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अनिस शहा, रजनीकांत कोठारी, दीपक सूर्यवंशी आणि राजेंद्र देशमुख या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कीर्तनातून मांडले जीवनदर्शन..
सायंकाळी शेवटच्या सत्रात दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी मानवी स्वभावावर भाष्य केले. “कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करू नका, कारण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना समाजप्रबोधन करत मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
आज महोत्सवाचा समारोप: ‘लावणी महाराष्ट्राची’चा तडका..
आज, २७ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तर रात्री ९ वाजता शशिकांत सरवदे व सहकारी ‘लावणी महाराष्ट्राची’ हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी या सांगता सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








