जळगाव, (प्रतिनिधी) : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सध्या जळगाव शहरात झंझावाती रॅलींचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान आमदार राजूमामा भोळे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “महायुतीला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रचाराचा हा झंझावात पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
शक्तीप्रदर्शनाने परिसर दणाणून गेला..
प्रभाग १६ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार वंदना संतोष इंगळे (१६ ब), रंजना विजय वानखेडे (१६ क) आणि सुनील वामनराव खडके (१६ ड) यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी उमेदवारांचे आणि आमदार भोळे यांचे औक्षण करून जंगी स्वागत केले.
विकासकामांची हीच पावती – आमदार भोळे
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार भोळे म्हणाले की, “आम्ही गेल्या काळात केलेल्या विकासकामांची पावती जनता आज रॅलीमध्ये दिसत असलेल्या अलोट गर्दीतून देत आहे. विरोधकांकडे कोणताही ठोस अजेंडा उरलेला नाही, त्यामुळे ते आता हतबल झाले आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिलांचा सहभाग ठरला लक्षवेधी..
या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे मुख्य आकर्षण ठरले. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.








