जळगाव, (प्रतिनिधी) : अजिंठा आर्ट सोसायटी तर्फे आयोजित ‘अजिंठा कला महोत्सवा’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जळगाव, जामनेर, खिरोदा आणि छत्रपती संभाजीनगर येथील कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या या महोत्सवात तब्बल ८०० कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन यु. यु. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर भरत गडरी यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागरमल जैन होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहदिप गरुड, विलास धनसिंग राजपूत, किरण सुर्यवंशी, ए. ए. पटेल, स्नेहल पाटील, पी. पी. साबळे (सहायक पोलीस निरीक्षक, फर्दापूर), आर. एस. चौधरी, व्ही. आर. पाटील, एस. के. पाटील, एस. टी. चिचोले, फिरोज पठाण आणि शेख झाकिर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रसाद जोशी यांनी केले.
त्यांनी अजिंठा आर्ट सोसायटीच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, अजिंठा शैलीसह चित्रकला, संगीत, शिल्प आणि नाट्य या अभिजात कलांचा प्रसार करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या २२ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
यु. यु. पाटील यांनी कला महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करून कलाकारांना प्रोत्साहन दिले. तर भरत गडरी यांनी, ग्रामीण भागात कलेचा अधिक प्रसार होण्याची गरज असून ठिकठिकाणी चित्रकलेची छोटी प्रदर्शने भरवावीत, असे मत व्यक्त केले. सागरमल जैन यांनी, शाळांमध्ये चित्रकला प्रदर्शनांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत पाटील यांनी ‘व्यक्ती चित्रण’ कलेचे थेट प्रात्यक्षिक सादर केले, जे उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मधुसूदन गरुड, गणेश कुमावत, देविदास बारी, दिनेश चौधरी, एस. आर. चव्हाण, बोरसे, एस. के. पाटील, मनोज शिवपुजे, आगळे, एस. डी. पाटील, अतुल जोशी आणि भूषण जोशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. टी. चिचोले यांनी केले.
हे चित्र प्रदर्शन ९ ते ११ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या ८०० कलाकृतींच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.








