जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात उद्या, शनिवारी (१० जानेवारी) राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने दोन मोठ्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फायरब्रँड नेते नितीन बानुगडे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची भाषणे होणार आहेत. या जोडसभांमुळे जळगावात राजकीय ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पिंप्राळ्यात बानुगडे पाटलांची सभा..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली असून, पिंप्राळा येथे उमेदवारांच्या प्रचारासाठी सायंकाळी सात वाजता पिंपराळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा आयोजित केला आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून नितीन बानुगडे पाटील असणार आहेत. आपल्या धारदार शैलीत विरोधकांचा समाचार घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले बानुगडे पाटील शिवसैनिकांना काय मंत्र देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी या शक्तीप्रदर्शनासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रभाग १२ मध्ये एकनाथ खडसेंची हुंकार सभा..
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची प्रभाग क्रमांक १२ मध्ये सायंकाळी सहा वाजता गोदावरी पिठाची गिरणी येथे जाहीर सभा होणार आहे. स्थानिक उमेदवार ललितकुमार घोगले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या सभेची जय्यत तयारी केली आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि महाविकास आघाडीची आगामी रणनीती यावर खडसे काय भाष्य करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांच्या सभा होत असल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडी मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि विरोधकांवर होणारी टीका यामुळे उद्याची सायंकाळ जळगावकरांसाठी गाजणार, हे निश्चित.








