जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे ‘ड’ गटाचे उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ रविवारी, ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उत्साहात करण्यात आला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव मनपा निवडणुकीत प्रभाग ७ मधून भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या प्रभागातून ‘अ’ मधून दीपमाला मनोज काळे, ‘ब’ मधून अंकिता पंकज पाटील आणि ‘क’ मधून विशाल सुरेश भोळे हे उमेदवार आधीच बिनविरोध निश्चित झाले आहेत. आता ‘ड’ गटातील उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे.
दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ..
गणेश कॉलनी येथील गुरुदेव दत्त मंदिर येथे आमदार राजूमामा भोळे आणि दिनकर गुरुजी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार भोळे म्हणाले की, “शहराच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना साथ देणे काळाची गरज आहे.”
प्रचारफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
शुभारंभानंतर चंद्रशेखर अत्तरदे यांची भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. ही फेरी श्रीकृष्ण कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, संत ज्ञानेश्वर कॉलनी आणि गणेश कॉलनी परिसरातून फिरली. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवाराचे स्वागत करत या प्रचारफेरीला मोठा प्रतिसाद दिला.
या प्रसंगी उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे यांच्यासह माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेविका जयश्री नितीन पाटील, मनोज काळे, माधुरी अत्तरदे, पंकज पाटील, भाजप सरचिटणीस चेतन तिवारी, सविता बोरसे, ऋषिकेश शिंपी, बंटी नेरपगार यांसह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








