जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशातील स्त्रीरोग तज्ञांचे मार्गदर्शक, अनेकांना वैद्यकीय क्षेत्रातील मूल्यांची जाणीव करून देणारे आणि आपल्या ज्ञानातून असंख्य रुग्णांना नव जिवन देणारे स्वर्गीय डॉ. उल्हास कडूसकर हे नाव आजही जळगावकरांच्या मनात आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याचा तोच वारसा जपत त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती कडूसकर यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
डॉ. उल्हास कडूसकर यांच्या पवित्र स्मृतींना सन्मान देत त्यांनी ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक असलेली विविध वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी उपयोगी उपकरणे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांना भेट स्वरूपात देण्यात आली आहेत.
या दानाच्या माध्यमातून केवळ उपकरणांचा हस्तांतरण नव्हे, तर एका डॉक्टरच्या मानवी सेवेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. प्रशांत वारके यांनी ही उपकरणे औपचारिकरित्या स्वीकारली. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे मार्केटिंग अधिकारी रतन जैन, महादेव हॉस्पिटलचे चंद्रकांत डोंगरे, मयूर पाटील, कुंदन भंगाळे, गोपाळ पाटील, प्रफुल भोळे, मयूर चौधरी तसेच डॉ. कडूसकर हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.








