जळगाव, (प्रतिनिधी) : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारात एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता यशस्वी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, हा अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या दोन मुख्य संशयित आरोपींना अटक केली आहे.
डमी ग्राहक पाठवून रचला सापळा..
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नशिराबाद पोलिसांनी तातडीने जळगाव ए.एच.टी.यू. (मानवी तस्करी विरोधी पथक) च्या मदतीने कारवाईची योजना आखली. पोलिसांनी एक डमी ग्राहक या अड्ड्यावर पाठवला. ग्राहकाकडून जेव्हा १५०० रुपयांची मागणी करण्यात आली, तेव्हा पोलिसांच्या पथकाने ठरलेल्या वेळी छापा टाकला.
६३ हजारांचा मुद्देमाल जप्त..
छाप्याच्या वेळी घरात पाच तरुणी आणि दोन चालक उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली असता, एकूण ६३ हजार ८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२ अटकेत, इतरांविरुद्ध गुन्हा दाखल..
याप्रकरणी पोलिसांनी राहुल कडू पाटील (रा. रायपूर फाटा, जळगाव) आणि राम विश्वास बोरसे (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) या दोघांना अटक केली आहे. तसेच, या व्यवसायात सहभागी असलेले चेतन माळी आणि श्याम विश्वास बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक..
ही महत्त्वपूर्ण कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार, तसेच ए.एच.टी.यू.च्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाकडून करण्यात आली.










