जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांची ‘सहाय्यक पंच’ (सामना पंच) म्हणून निवड झाली आहे.
दोन दशकानंतर भारतात होत असलेल्या या महत्त्वाच्या स्पर्धेत अशी नियुक्ती मिळवणारे प्रवीण ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच बुद्धिबळ पंच ठरले आहेत. त्यांची ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) केली आहे.
या स्पर्धेचा कालावधी ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर असून ८० हून अधिक देशांचे 2२०६ खेळाडूंनी यात सहभाग घेतला आहे. तसेच स्पर्धेत डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, दिव्या देशमुख यांसारखे कसलेले खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई आणि वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलेल्या प्रवीण ठाकरे यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन आणि सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्यांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि इतर सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










