जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेअंतर्गत सरळ सेवा पद भरती २०२३ च्या प्रतिक्षा यादीतील १० उमेदवारांना अखेर पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार ही महत्त्वाची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर असलेला जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ च्या कर्मचारी रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
या पदस्थापनामध्ये एकूण १० उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये ६ कनिष्ठ सहाय्यक, ३ आरोग्य सेवक आणि १ औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि आवश्यकतेनुसार जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवर नियुक्त करण्यात आले आहे.
प्रशासकीय यंत्रणेला मिळणार बळकटी..
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या नियुक्तीबद्दल बोलताना सांगितले की, “जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील रिक्त पदे भरल्यामुळे प्रशासनाचे कामकाज अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. तसेच, विविध विभागांतील सेवा पुरवठा अधिक गतिमान होईल.” या पदस्थापनांमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेला बळकटी मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.










