जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. बॅंगलोर येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू असलेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्युरोगी आणि १५ वी पुमसे स्पर्धेत तिने हे यश संपादन केले.
निकिता पवार हिने ५५ किलो वजन गटात अत्यंत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिने स्पर्धेतील प्रत्येक फेरीत आपल्या प्रतिस्पर्धकांना सहज पराभूत केले. अंतिम लढतीत तिने आसामची खेळाडू व्हिएना हजारिका हिचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले.
आगामी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
गेल्या चार वर्षांपासून नियमित सराव करणाऱ्या निकिताला प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या लक्षवेधी कामगिरीमुळे तिची निवड शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली असून, ती जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
निकिताच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन अध्यक्ष अतुल जैन, ललित पाटील, सुरेश खैरनार, अजित घारगे, रविंद्र धर्माधिकारी, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, अरविंद देशपांडे यांच्यासह जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.










