जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), जळगाव यांच्याकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सायंटोमेट्रिक अभ्यास’ या विषयात त्यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले.
प्रा. प्रिती महाजन या गंगाधर रामदास पाटील आणि विमल गंधाधर पाटील या शिक्षक दांपत्याच्या कन्या असून, जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील सहायक शाखा व्यवस्थापक नितीन सुखदेव महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना एसएसव्हीपीएस कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा येथील डॉ. तुषार पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील त्यांचे हे संशोधन भविष्यात अनेक अभ्यासकांना माहितीचा वापर सुलभ करण्यास मदत करेल. त्यांनी आपली डॉक्टरेट पदवी त्यांची नियुक्ती करणाऱ्या स्व. गोदावरी पाटील यांना समर्पित केली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, आणि सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या पाठबळामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.