जळगाव, (प्रतिनिधी) : रामदास कॉलनीतील एम.जे. कॉलेज रोड परिसरातील ‘चॅट अड्डा’ नावाच्या कॉफी शॉपवर रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी दि. ८ रोजी छापा टाकून तीन मुले आणि तीन मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. पोलिसांनी त्यांची नावे आणि पत्ते विचारून त्यांना समज देऊन सोडून दिले, मात्र कॅफेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना या कारवाईदरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘चॅट अड्डा’ (अन्नपूर्णा फुड्स) या गाळ्यात कॉफी शॉपचा परवाना नसताना आणि खाद्यपदार्थ विक्रीची कोणतीही व्यवस्था नसताना, प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डचे छोटे-छोटे, गोपनीय कंपार्टमेंट्स (कप्पे) तयार करण्यात आले होते. या कप्प्यांना पडदे लावून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे उघड झाले आहे.
बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना या प्रकाराची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, जितेंद्र राठोड, योगेश बारी आणि जितेंद्र राजपूत यांच्या पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा टाकला. यावेळी आतमध्ये कॉलेजियन्स अश्लील चाळे करताना आढळले.
पोलिसांनी व्यवस्थापक मयूर धोंडू राठोड (वय २५, रा. वाघनगर, जळगाव) याची चौकशी करून कॅफेची तपासणी केली. तपासणीत कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, गॅस, कॉफी पावडर किंवा विक्रीसाठी खाद्यपदार्थ आढळले नाहीत. तसेच, कॉफी शॉपचा परवाना दर्शनी भागात दिसला नाही. डस्टबीन आणि इतर तपासणीत आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. याप्रकरणी योगेश बारी यांनी फिर्याद दिली असून, व्यवस्थापक मयूर राठोड याच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.