जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रिकेट चाहत्यांना निराश करणारा निकाल लागला आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केरळने महाराष्ट्राचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालने तामिळनाडू संघावर विजय मिळवत विजेतेपदासाठीचा आपला दावा पक्का केला. त्यामुळे आता गुरुवारी विजेतेपदासाठी पश्चिम बंगाल आणि केरळ या दोन संघांमध्ये जोरदार लढत होणार आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्र आणि केरळ संघात झाला यावेळी जैन फार्म फ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शारव शहा आणि आदर्श गव्हाणे यांनी या निर्णयाला योग्य ठरवत शानदार फलंदाजी केली आणि शतकी भागीदारी रचली. शारव शहा ४६ धावांवर बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या १०७ होती. त्यानंतर आदर्श गव्हाणे (४८ धावा) याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत १६५ धावांचं आव्हान केरळसमोर ठेवलं. मात्र, १६६ धावांचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या केरळच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत १९.३ षटकांत १६९ धावा करत विजय मिळवला. केरळच्या सलामी जोडीने विजयाचा भक्कम पाया रचला. या सामन्यात आदी लोंगणी याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
पहिला उपांत्य फेरीचा सामना पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांच्यात झाला. पश्चिम बंगालने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत ९ गडी गमावून १११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल तामिळनाडूचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १०८ धावाच करू शकला. या रोमांचक सामन्यात पश्चिम बंगालने १ विकेटने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
विजेतेपदाची लढत गुरुवारी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये होणार असली तरी, स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना उद्या सकाळी ८.०० वाजता तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र यांच्या दरम्यान खेळविण्यात येईल. याच दरम्यान बुधवारी साखळी फेरीचे दोन सामनेही खेळले गेले. पहिल्या सामन्यात उत्तराखंडने युएईचा १० गडी राखून सहज पराभव केला. युएईचा संघ केवळ ५४ धावाच करू शकला, जे आव्हान उत्तराखंडने ४.५ षटकांत पूर्ण केले.
दुसरा साखळी सामना महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात झाला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना शारव शहा (३०), विश्वजित जगताप (१८), आदर्श गव्हाणे (नाबाद २२) आणि आदी लोंगणी (१८ चेंडूत ३८ धावा) यांच्या दमदार खेळीच्या बळावर १३४ धावांचा डोंगर रचला. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे आव्हान आंध्र प्रदेशला पेलता आलं नाही, त्यांनी १५ षटकांत ९८ धावा केल्या.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम..
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक तन्वीर अहमद आणि क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, अजित घारगे, योगेश ढोगंळे, मुस्ताक अली, उदय सोनवणे, धनश्याम चौधरी, तन्वीर अहमद, राहुल निंभोरे, शशांक अत्तरदे, समीर शेख, जयेश बाविस्कर, किशोरसिंग शिसोदिया, प्रविण ठाकरे, मोहम्मद फजल, नचिकेत ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.