जळगाव, (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या ‘इको क्लब’ने एक स्तुत्य उपक्रम राबवला. शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाडांच्या बियांपासून ‘बीज फटाके’ तयार केले.
दिवसेंदिवस वाढत चाललेले वायु प्रदूषण आणि फटाक्यांमुळे होणारे अपघात याविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. उपशिक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना हे पर्यावरणपूरक बीज फटाके बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मुलांना ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देखील देण्यात आली, जेणेकरून विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत फटाके वाजवणार नाहीत. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “फटाके फोडण्यापेक्षा फटाक्याच्या आकारात बनवलेले हे बीज फटाके जर विद्यार्थ्यांनी कुंडीत लावले, तर त्यातून नवीन रोपटे तयार होईल. यामुळे निसर्गाला हानी न पोहोचता पर्यावरणाचा फायदाच होईल.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबद्दल आणि प्रदूषणमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, दिवाळी एक आनंददायी आणि पर्यावरणपूरक सण म्हणून साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.