जळगाव, (प्रतिनिधी) : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच, राष्ट्रीय स्तरावरील आंतर-महाविद्यालयीन विद्यापीठ क्रीडा स्पर्धा जळगावात आयोजित करण्यात आली आहे. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन तर्फे ०८ ते १० ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. दरम्यान गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. नीलिमा वारके आणि क्रीडा विभागाचे चंद्रकांत डोंगरे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र, नोएडा, केरळ, गुजरातसह देशभरातील ३० हून अधिक महाविद्यालयांमधील सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थिनी सहभाग घेत आहेत. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात एकूण २८ प्रकारच्या ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एसएनडीटी विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असून, पहिल्यांदाच जळगाव येथे होत आहे. या स्पर्धा गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि एकलव्य क्रीडा संकुल येथे पार पडणार आहेत.
व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, तायक्वांदो तसेच ॲथलेटिक्स (१००, २००, ४०० मीटर धावणे, उंच उडी/लांब उडी /अशा विविध क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. प्रत्येक खेळासाठी कुशल पंच आणि प्रशिक्षक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मैदानावर डॉक्टरांची टीम आणि अत्यावश्यक सेवा ॲम्बुलन्सची सोय देखील उपलब्ध असेल.
या स्पर्धांचा समारोप १० ऑक्टोबर रोजी होणार असून विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. तसेच सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.