कल्याण, (वृत्तसेवा) : खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने ‘एक उपवास सहवेदनेचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण (जि. ठाणे) येथे झालेल्या अंनिसच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपस्थित राज्यातील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेत सहभागी होण्यासाठी एक दिवस अन्नत्याग (उपवास) करण्याचा संकल्प केला.
निर्णय आणि उपक्रम:
उपवासातून वाचलेले पैसे आणि कार्यकर्त्यांनी संकलित केलेला निधी एकत्रित करून पूरग्रस्तांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते बाधीत गावांमध्ये जाणार आहेत. यासोबतच पूरग्रस्तांसाठी मानसिक आधार प्रकल्प देखील राबविण्यात येणार आहे. या बैठकीला राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला यांच्यासह राज्यातील ३० जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होऊन आगामी उपक्रमांचे नियोजनही ठरवण्यात आले.