जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकास्तरावर २१ आणि २२ सप्टेंबर रोजी झालेल्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्हा क्रीडा मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांच्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे यश केवळ खेळाडूंच्या कठोर मेहनतीचेच नव्हे, तर त्यांना नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिकेचेही प्रतीक असल्याचे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी सांगितले.
या यशासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी आणि आकाश धनगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या ऐतिहासिक विजयाबद्दल अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह मनोज दाडकर, रूपाली वाघ आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.