मुंबई, (वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता या योजनेतील पात्र महिलांना त्यांचे आधारकार्ड ई-केवायसीद्वारे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात नुकतेच आदेश जारी केले आहेत.
या योजनेतील सुमारे २६ लाख महिला निकषांनुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची पडताळणी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केली नाही, त्यांना पुढील दोन महिन्यांत ladkibahin.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. असे न केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद होऊ शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थींनी या बदलाची नोंद घेऊन वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.