जळगाव, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेनुसार, वस्तू आणि सेवा करांच्या (GST) दरांमध्ये मोठी पुनर्रचना करण्यात आली आहे. या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुलभ होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जीएसटी दरकपात ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर सुधारणा आहे. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा कमी होणार असून, ग्राहकांना दिलासा मिळेल. सध्याची चार-स्तरीय कररचना १८% आणि ५% अशा दोन स्तरांमध्ये सुसूत्रीत केली जाईल. यामुळे व्यापार, उत्पादन आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
श्री. चव्हाण यांनी नमूद केले की, २०१४ पूर्वी देशाची आर्थिक प्रगती अत्यंत संथ होती. भ्रष्टाचार आणि किचकट करप्रणालीमुळे देशाचे आर्थिक नुकसान झाले. मात्र, मोदी सरकारने २०१७ मध्ये जीएसटी लागू करून आर्थिक सुधारणांना वेग दिला, ज्यामुळे आज २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असून, देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
मोदी सरकार विकासाचे राजकारण करत असून, जीएसटी दरकपातीचा फायदा प्रत्येक राज्यातील जनतेला, उद्योजकांना आणि व्यावसायिकांना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला, दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.