जळगाव, (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ती फाउंडेशन आणि अरुश्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम भवन येथील अरुश्री हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात डॉ. स्वाती परिक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील टीमने जवळपास २६७ महिलांची तपासणी केली. यामध्ये हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, आणि फुफ्फुसांची तपासणी (PFT) यांचा समावेश होता.
या शिबिराला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात. डॉ. परिक्षित आणि डॉ. स्वाती बाविस्कर यांचे रुग्णसेवेतील योगदान समाजासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अरुश्री हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.