जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी, स्व. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यंदा जैन इरिगेशनच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. या वर्षी एकूण ४४५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यासोबतच, ‘स्नेहाच्या शिदोरी’ उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील विविध सेवाभावी संस्थांमधील सुमारे ५५० गरजू व्यक्तींना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात जैन इरिगेशनच्या जळगावातील जैन प्लास्टिक पार्क, फूड पार्क तसेच अलवर, बडोदा, चित्तूर, हैदराबाद आणि उदमलपेट येथील आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये जळगाव येथील जैन प्लास्टिक पार्कमध्ये २१७, फूड पार्कमध्ये ११७, तर इतर ठिकाणांहून अलवर ४, बडोदा ९, चित्तूर २५, हैदराबाद ८ आणि उदमलपेट येथील ६ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क येथील डेमो हॉलमध्ये आणि फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीजवळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जैन इरिगेशनने नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असून, हे रक्तदान शिबिर त्याच परंपरेचे प्रतीक आहे.
जैन प्लास्टिक पार्क येथील शिबिराचे उद्घाटन रेडक्रॉस ब्लड बँकेच्या अध्यक्षा मंगला ठोंबरे यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, उज्ज्वला वर्मा, डॉ. राजकुमार वाणी, डॉ. राहुल पाटील, डॉ. विद्या शिरसाठ, डॉ. कपिल पाटील, तसेच जैन इरिगेशनचे सी.एस. नाईक, राजश्री पाटील, किशोर बोरसे, डॉ. अश्विनी पाटील, अश्विनी खैरनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फूड पार्क येथील शिबिराचे उद्घाटन विजय मुथा यांनी केले. गोळवलकर ब्लड बँक आणि गोदावरी ब्लड बँकेने रक्त संकलनाचे कार्य केले. या दोन्ही शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी मानव संसाधन आणि कार्मिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.