जळगाव, (प्रतिनिधी) : शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी जळगाव शहर मतदारसंघातील भाविक-भक्तांसाठी अयोध्या आणि काशी येथील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी मोफत रेल्वे प्रवासाचे आयोजन केले आहे. यात्रेसाठीच्या विशेष रेल्वेला रविवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
या विशेष रेल्वेने साधारण दोन हजार भाविक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी निघाले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमदार भोळे स्वतः या प्रवासात त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.
यावेळी भाजपचे पूर्व आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी मिलिंद साळुंखे, स्टेशन मास्तर चौधरी आणि नन्नवरे उपस्थित होते. आमदार भोळे यांच्या या उपक्रमामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.