जळगाव, (प्रतिनिधी) : सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये केलेल्या अतुलनीय योगदानासाठी जळगाव येथील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व संघपती सेवादास दलिचंद जैन यांना प्रतिष्ठेचा ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चेन्नई येथे आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनाही त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक योगदानाबद्दल ‘मारवाड रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, तो त्यांना लवकरच प्रदान केला जाणार आहे.
चेन्नई येथील जय ब्रज मधुकर समितीने जैन हिल्स येथील आकाश प्रांगणात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हा सोहळा प्रथम युवाचार्य बहुश्रुत प.पु. मिश्रीमल जी म.सा. ‘मधुकर’ यांच्या सुशिष्या राजगुरुमाता प.पु. उमरावकुँवर जी अर्चना यांच्या १०३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. या समारंभात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील अनेक भागांतून आलेल्या जैन श्रावक-श्राविकांची मोठी उपस्थिती होती.
आपल्या सत्काराला उत्तर देताना सेवादास दलिचंद जैन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “वाकोदसारख्या छोट्या गावातून आमचा परिवार आला. हा विकास केवळ शिक्षणाने शक्य झाला. कोणत्याही कार्यासाठी समाजात आणि संघात एकता असणे आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. हा पुरस्कार मी माझ्या प्रत्येक जैन संघ सदस्याला समर्पित करतो.” यावेळी त्यांनी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करू या जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे…’ या संदेशाचा उल्लेख केला. या कार्यक्रमात जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला किशोर मुथा (हैदराबाद), लुणकरण कोठारी (सुरत), तुलसी बोथरा, दिलीप चोपडा, नंदलाल गादिया, संजय बाफना (उज्जैन), विनोद मुनोत, पारस राका, विनय पारख, अमर जैन, जितेंद्र कोठारी, प्रवीण पगारिया यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.