जळगाव, (जिमाका) : जळगाव-संभाजीनगर रोडवर उभारल्या जात असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांच्यासोबत उपस्थित होते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देणे आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना पुणे आणि मुंबईसारख्या शहरांवर उपचारांसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.

चिंचोली शिवारात ६६.२७ एकर परिसरात हा मेडिकल हब तयार होत आहे. यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे. निवासस्थाने आणि वसतिगृहे यांचेही बांधकाम सुरू आहे.
यावेळी अजित पवार आणि गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष इमारतींची पाहणी केली आणि काही त्रुटी आढळल्या. त्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रासाठी दीर्घकाळात ‘गेम चेंजर’ ठरेल असे सांगितले. हा प्रकल्प जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, कारण यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आणि डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.










